संध्याकाळी जेवण करून झोपलो, थोडीफार डुलकी लागली न लागली तोच मोबाईलची रिंग वाजली, कंटाळा आला होता ;पण रात्रीच्या वेळेला कॉल आला म्हणून पहिला,माझ्या एका शिक्षक मित्राचा फोन आला होता,
"अरे बघितली का पी डी एफ ?"
"कसली?"
"अरे लागली की नवोदय ची मेरिट लिस्ट,टाकली तुझ्या व्हाट्सएपला...बघ कोणी आहे का तुझा विद्यार्थी?' असं ऐकतंच मित्राचा फोन काटला, अन लगेच व्हाट्सएप उघडून फाईल डाउनलोड करायला लागलो. मी रहायला शाळेच्या मुख्यालयीच होतो, खेडं गाव घाणखेडा,, तिथं काही फारसं नेटवर्क नव्हतं... पण आता फाईल डाउनलोड होउस्तवर मला चैन पडत नव्हती. यापूर्वी मागील दोन वर्षांपासून अशीच मोठ्या हौसेन मेरिट निवड लिस्ट पहायची सवय झाली होती. यावर्षी मात्र विद्यार्थी तय्यारी गेल्या दोन वर्षांपासून जरा जास्तच झाली होती अन सरावात मुलांना चांगले मार्क्स मिळत होते, त्यामुळे लिस्ट वाचून पाहतांना हृदयात धडधड वाढत होतं. बाकीच्या लोकांना फक्त त्यांच्या 10, 12 वि, जास्तीतजास्त नोकरीच्या परीक्षेची यादी पाहताना छातीत धडधड होत असेल पण शिक्षकांना मात्र 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'या संतोक्ती प्रमाणे,नेहमीच आमचा निकालाशी संबंध असतो. नवोदय प्रवेश परीक्षेची यादी पाहतांना सर्व यादीवर किती लवकर नजर फिरून आपल्या शाळेतील एखादा विद्यार्थी कधी यामध्ये दिसतो अशी शिगेला पोहोचलेली उत्कंठा यापूर्वी दोन वर्षे मातीत मिसळलेली होती पण यावेळी तरी आपल्या प्रयत्नाला यश येईल अशी आशा होती,अन त्यामुळे सर्वांगाचे बळ नेत्रात घेऊन यादी वाचत होतो तोच 'नम्रता' असे नाव मोठ्या अपेक्षेने पटकन वाचले डोळ्यात आनंद यावा अन लगेच ती आपली नम्रता नसुन दुसऱ्या शाळेची आहे हे समोरचं वाचल्यावर कळालं अन भ्रमनिरास.. कारण नम्रता शाळेत घेतलेल्या सराव परीक्षेत प्रथमच यायची...आता कोणाचे नाव येईल??थोडं अशक्यच वाटत होतं तोच माझी नजर एका नावावर येऊन थांबली!!!!ते नाव होतं मयूर चं.... पटकन वेळ न दवडता सगळंच नाव वाचलं अन मग काय आनंद गगनात मावेना!!! माझा विद्यार्थी 'मयूर एलदोडे' या यादीत आला होता....सरसर यादी वाचली..... "माझा विद्यार्थी मयूर नवोदय ला लागलाय !!!!" असं मोठ्या आवजात स्वतःशीच मोठया मोठयाने म्हणू लागलो... माझ्या आवाजाने माझी पत्नी उठली ,"काय झालं हो??" अगं तो मयूर नाही का ???तो नवोदय विद्यालयाला पात्र झाला, कल्याण झालं बिचाऱ्याच... पोरगं गरीब घरचं पण खूप हुश्शार.... नाव कमावलं स्वतः च अन आपल्या शाळेचं सुद्धा!!असं म्हणत म्हणत मी अंगात कपडे चढवले. "अहो कुठं निघालात आत्ता?? रात्रीचे 11 वाजायला लागले न एवढ्या रात्री कुठं?" "फोन लावा की मयूर च्या घरी..." पण मयूर च्या तेव्हा फोनच नव्हता. एवढी आनंदाची बातमी स्वतः त्याच्या घरी जाऊनच सांगावी या बेतान घर उघडून बाहेर पडलो होतो पण खालतल्या आळीत एवढया रात्री जरा आवघडचं होतं, अन वरून तिकडच्या वाड्यात डेंजर कुत्रे पण असतात हे मला माहीतच असल्याने आणि आता सगळाच गाव झोपला आहे, येवढ्या रात्री तिकडे जाणे योग्य नाही हे माझ्या लक्षात आल्याने अगदी जड पावलान मी पुनः घरात आलो ..
'माझा विद्यार्थी मयूर नवोदय ला प्रवेशित होतोय 'या आनंदाच्या बातमीनं मी पार फुललो होतो. माझ्या पत्नीनं याचं वेळी एवढ्या प्रसंगी मला अत्यानंद झाल्याचे पाहून आनंदानं चहा बनवला, दोघंही खुश होतो. "आता मयूर कुठं जाईल शिकायला ?कितवीपर्यंत शिक्षण होईल?कसं, काय,कुठं? असे तिच्या मनात असलेले बरेच प्रश्न ती मला विचारायची अन मी तिला उत्तर द्यायचो... असं बराच वेळ चालू होतं. आता बोलता बोलता बरीच रात्र होऊन गेली होती. बोलत बोलतच माझ्या पत्नीला झोप लागली होती... मी मात्र माझा पहिलाच विद्यार्थी नवोदय ला पात्र झाल्याने जाम खुश झालो होतो! माझ्या मेहनतीला फळ आलं होतं. यावेळी मला माझ्या बालपणी माझ्या मनात असलेलं नवोदय आठवत होतं. विविध स्वप्न माझ्या जागत्या डोळ्यासमोर दिसत होती. एक शिक्षक म्हणून माझा आनंद अवर्णनीय होता.
विद्यार्थ्यांना कसं शिकवलं? कशी तय्यारी केली ? आम्ही सर्व शिक्षकांनी केलेले प्रयत्न अन् मयूरचे मार्क...हे सगळं आठवत होत आणि आता त्याची पुढची व्यवस्था... त्याचा आणि पर्यायाने आपला सन्मान ...सगळं मी अनुभवत होतो... झोप मात्र आज माझ्याजवळून पार दूर निघून गेली होती... पुन्हा पुन्हा मोबाईलवर यादी वाचून पाहणं अन मयूर च्या नावावर येऊन थांबणं.... असं कितीतरी वेळा झालं होतं.
आनंद हा दिल्याने वाढतो म्हणतात... कोणाला तरी काळवावं या आशेने कुणी रात्री घराबाहेर येईल अशी वाट पाहत होतो...तेव्हड्यात आमचे शेजारी आप्पा त्यांचा घराचा दरवाजा उघडून बाहेर आले न आले तोच मी पण बाहेर आलो अन ही आनंदाची बातमी त्यांना सांगितली. अप्पा दोन मिनिटं बोलले त्यांना याविषयी फार कळत नव्हत , उगीच काहीतरी बोलले आणि "गुरुजी एवढी रात्र तरी तुम्ही जागीच आहेत का हे संगायासाठी ! सकाळी सांगा त्यांना ,झोपा आता." असं म्हणून आप्पा पुन्हा घरात गेले.. आता घड्याळात अगदी राम प्रहरीचे चार वाजले होते. कोंबड्यांच्या आरवन्याचा आवाज माझ्या कानावर आला. 'यशस्वी होणाऱ्या सर्वांनाच सकाळी कोंबड आरवन्याच्या याच वेळी उठावं लागतं' हे माझ्या बाबांनी माझ्या लहानपणी सांगितलेलं वाक्य आठवलं .
'खेड्यातील माणसं लवकर झोपतात आणि लवकर उठतात'. अगदी पाच वाजेच्या वेळेला शेणपाणी करण्यासाठी , दूध काढण्यासाठी जाणारी, महादेवाच्या मेळात पूजेसाठी जाणारी मानसं आता मला रस्त्यावर दिसू लागली होती; तरी पण या बौद्ध वाड्याच्या गल्लीत एवढ्या सकाळी जाण्याची हिम्मत होत नव्हती. चांगली बातमी द्यायची आहे मयूर च्या घरी , मयूर च्या घरचे उठेपर्यन्त आपण अंघोळ करावी असा विचार करून मी स्वतः पाणी तापवून अंघोळ केली, तोपर्यंत आता बाहेर बरंच उजाडलं होतं..
अतिशय आनंदात मी मयूरचा निकाल आणि माझा अभिमान सांगायला आता येलदोड्याच्या वाड्याकड निघालो होतो. रस्त्यात काही माणसांनी मला मुद्दाम यावेळी "गुरुजी इकडं कुठ?" असं हाटकलं होतं.
अगदी सकाळीच रामपाहार्यात भुंकणाऱ्या कुत्र्यांना सावरत मी मयुर च्या दारी आलो, मोठ्या हिंमतीने दरवाजा वाजवला.."कोण हे....?" आजोबाचा आवाज आला, कदाचित ते जागीच असल्याचे मला कळाले. ....
"मी झगरे गुरुजी आहे! उघडा दरवाजा!" अस मी फर्मावलं.
"अरे बापा ,गुरुजी !! एवढ्या सकाळी!" मुरलीधर बाबाने दरवाजा उघडला.
"गुरुजी, एवढ्या सकाळीच कसकाय???"
"अहो आलो तुम्हाला आनंदाची बातमी सांगायला!"
"कोणती बातमी ?" बाबानां मोठ्या उत्सुकतेन माझ्याकड पाहून विचारलं .
"मयूरला उठवा, त्याचा नवोदय चा निकाल आलाय,, तो चांगल्या मार्कांन पास झालाय अन त्याचा आता अंबा परतूर ला नंबर लागलाय" मी मोठ्या आवेशान सांगितलं
"अरेबापरे!!! अगं ये....! ऐकलं का.....???? ऊठ , हे गुरुजी आलेत... मयुर ला उठावं, पोराचा नंबर लागला म्हणतेत सर परतूर लं!!" आजोबा क्षीण असलेल्या देहातून फार मोठा आवाज काढत म्हणाले आणि त्यांचा आवज ऐकून वाड्यातली बरीच माणसं आता माझ्याकडं आली होती....
या चर्चेन मयूर ला पण जाग आला होती.पारस्या तोंडानं तो माझ्याकडे आला न मी अगदीच त्याला जवळ उचलून घेतलं. " अरे वा मयुर! अभिनंदन!! तू नाव कमवलंस !!" तोपर्यंत मयुर च्या आजीनं चहा ठेवला होता. ..आता माझं पोरगं दूर शिकायला जाईन अन साहेब होईल! या आशेने मयूर च्या आईला आनंदाचं रडू होतं.. गाईनं वासराला जवळ घावं तस त्या काबाडकष्ट करणाऱ्या गरीब मायणं आपल्या हुशार लेकराला कुशीत घेतलं होतं
"माझा मय्या साहेब होईल का सर आता?" असा फारसं काही नवोदय विषयी न समजणाऱ्या मयूर च्या आजीने मला विचारलं.
""हं.. नक्कीच आपला मयूर हुश्शार आहे. तो साहेबच होणार." असं मी उत्तरलो.
आता याला कुठं शिकावं लागल? त्याची जेवणाची सोय कशी असेल? याला कोण सोबती मिळेल? असे अनेक शंकेचे आणि उत्सुकतेचे स्वप्न मला गर्दीतील मानसं विचारत होती अन् मी त्यांना मोठ्या अभिमानाने उत्तरे देत होतो. तेवढ्यात चहा तय्यार झाला होता. "अरे चहा द्या गुरुजींना, आणि आणखी मानसं आलीत त्यांना पण वाढवा." असं मयूर चे पप्पा बोलले . जवळ गोळा झालेल्या लहानग्यांना मयूर साखर वाटायला लागला होता. दीक्षा नावाची त्याची बहिण तो मला सोडून परतूर ला शिकायला जाणार.. तिथे दादा एकटा कसा राहील? या प्रश्नाने रडायला लागली होती. आई तिला समजावत 'बेटा तुला पण असाच अभ्यास करून दादाकडच शिकायला जायचं आहे'असं म्हणून तिची समजूत काढत होती. हि सामन्यातली असामान्य आई आपल्या मुलाला यशस्वी करण्यासाठी कसं विचार आणि जिद्दीचे खतपाणी घालते ' हे पाहून मी सुद्धा प्रभावित झालो होतो.
गरीबाची झोपडी, त्यामध्ये राहणारं गरीब कुटुंब, कदाचित खाण्यापिण्याची अडचण असेल पण बाबासाहेबांचा मोठा फोटो, त्यासमोर पुस्तकांचा मोठा गठ्ठा.... बाबासाहेबांचा फोटो घरात लावून त्यांच्या फोटोसमोर अभ्यास करणाऱ्या मयूरन हे यश प्राप्त केलं होतं. मागास प्रवर्गातील असून सुद्धा मयूर चा खुल्या प्रवर्गात नंम्बर लागला होता. आमच्या शाळेतून अन गावातून नवोदय ला प्रवेशित होणार मयूर हा पहिलाच मुलगा होता. माझे सहकारी मित्र खरे सर , मुख्याध्यापक शेवाळे सर आणि मी अगदी पाहिल्यावर्गापासून या शाळेसाठी आणि मयूरसाठी केलेल्या कष्टांच आज फळ हातात आलं होतं .
मयूर ला बाजूला करून त्याचे आई बाबा माझ्या जवळ आले अन् पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्याकडं बघून म्हणाले,"गुरुजी किती आनंदाची बातमी दिली आम्हाला! खरंच आम्ही काय करू शकतो तुमच्यासाठी! आज एवढ्या सकाळी तुम्ही आम्हाला इतकं आनंदी केलंय की आम्ही हा दिवस कधीच विसरू शकणार नाही!"
बघता बघता बरीच वाड्यातली माणसं गोळा झाली होती, मयूरचं आणि आमच्या शाळेत त्यांच्या तोंडून चाललेलं कौतुक ऐकून मला मात्र कृत्य कृत्य झाल्याचं वाटत होतं...!
x
No comments:
Post a Comment