About Me

My photo
मी एक शिक्षक असून कीर्तन करणे आणि संतविचार समाजात रुजविणे हा माझा प्रयत्न. कथाकथन करण्याची आवड असून लिखाणाची आवड आहे.

Saturday, October 12, 2019

माझ्या शाळेचे स्नेहसंमेलन


                  “अहो गुरुजी, माह्या शुभ्यालं दिट (दृष्ट) झालीनं बाप्पा!, रातच्या शाळामधल्या कार्यक्रमात नाटक केल्यानं! लय भारी पोऱ्हं बोलायला लागलेत कि आता आपल्या शाळातले!” असं शुभम जगधने ची आजी सकाळी सकाळी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन मला म्हणाली.त्यावेळी  तिथं  उभे असलेले अनेक पालक ,गावकरी रात्री झालेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमांच तोंडभरून कौतुक करत होते. रात्री कार्यक्रम संपायला बराच वेळ लागला होता त्यामुळं नक्कीच आज कमी  विद्यार्थी शाळेत येतील असं मला वाटलं होतं, परंतु तो माझा अंदाज खोटा ठरवून आज जेमतेम सगळीच मुल शाळेत आलेली नजरेस पडली! प्रार्थना घेतांना मुलांच्या चेहऱ्यावरील त्यांनी चांगली कामगिरी पार पाडल्याचा अभिमानी आनंद पाहून माझं उर सुद्धा भरून येत होतं.  ‘मुलांमध्ये किती सुप्त गुण असतात आणि त्यांना संधी दिली तर ते किती निर्भीडपणे आणि अनाकलनीय व्यक्त होतात!’ याची जाणीव मला या सम्मेलनाने करून दिली होती. शाळेसाठी भरपूर मदत निधी एका रात्रीत गोळा झाला होता, शिक्षक आपल्या मुलांना किती जवळीकतेने स्वीकारतात याची जाणीव पालकांना झाली होती. शाळेविषयी अभिमानाचे शब्द कितीतरी पालकांच्या आणि गावातील प्रतीष्ठीतांच्या  तोंडून ऐकायला येत होते. आजपर्यंत सतत शाळेसाठी धडपडणारे आम्ही  शिक्षक पण आजपासून लोकांच्या नजरेतून पास झालो होतो...! निमित्त होते स्नेहसंमेलन “किलबिलाट” कार्यक्रमाचे.             आपल्या शाळेतील विद्यार्थी , शिक्षक आणि गावकरी यांचा त्रिवेणी संगम घडवून आणण्यासाठी ‘स्नेह्संमेलन’ हि एक महत्वाची पर्वणी आहे असे मला वाटते . वर्षभर आपण विद्यार्थ्यांसाठी ‘काय करतो’ याची चमक आणि चुणूक  दाखवण्याचा व शाळेविषयी समाजाच्या मनात जागा निर्माण करण्याचा या सुंदर ‘दुग्धशर्करा योग’. ‘आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असलेले अनेक सुप्त गुण बाहेर काढून त्यांना समाजासमोर मांडून त्यांचा आत्मविश्वास वाढवून भावी नागरिक बनविण्यासाठी हा एक मैलाचा दगड मानावा असे मला वाटते!’ त्यासाठी शिक्षकांनी मात्र मनाची तय्यारी ठेवायला हवी.स्नेहसंमेलन तयारी म्हणजे जेमतेम एक महिना अवधीचा हा उपक्रम. अगदी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन, पालक मेळावा घेऊन शिक्षकांना जबाबदाऱ्या वाटप करून शाळेच्या नोटीस बोर्डवर सूचना लावून स्नेहसंमेलनाचा श्रीगणेशा करायचा. विद्यार्थ्यांना स्नेहस्म्मेलनात कोणकोणते इव्हेंट घ्यायचे आहे याची जाणीव देऊन त्यांच्याकडून त्यांच्या आवडीनुसार त्यांना कोणत्यातरी घटकात भाग घ्यायला लावणे म्हणजे शिक्षकाच्या यशाचं पाहिलं पाउल ठरतं!  शंभर टक्के मुलांना सहभागी करणे हे एक आव्हान असतं. यातील काही विद्यार्थ्यांना नृत्य तर काहींना नाट्य आवडेल. यामध्ये गायन,वादन,भाषण,संभाषण,मुकाभिनय,एकपात्री नाटक, संगीत ड्रामा असे वेगवेगळे इव्हेंट असायचे. काही विद्यार्थ्यांना वरीलपैकी काहीच करण्याची इच्छा नसली तरी त्यांना निदान एखाद्या नाटिकेत किंवा समूहनृत्यात सहभाग घ्यायला लावणं हि एक आमची हातोटीच झाली होती.                    पारंपारिक लोकनृत्ये,ग्रामीण जीवनाचे पैलू उलगडणारे विविध गीते, रंगदेवता प्रसन्नतेसाठी संतांचे अभंग किंवा गवळण घेणे आणि समाजिक प्रबोधनावर प्रकाश टाकण्यासाठी एकांकिका ठरविणे हे सुद्धा एक अफलातूनच असायचं. स्त्रीशक्ती जागर, व्यसनमुक्ती ,हुंडाबळी ,पर्यावरण संवर्धन,सामाजिक एकता यांसारख्या बाबींवर प्रकाश टाकणे आमचा हातखंडा असायचा. कधीकधी विनोदी तर कधीकधी भावनाप्रधान प्रसंग बनविणे यासाठी सरावाने खूप प्रयत्न करावे लागायचे. शेवटी देशाभिमान जागृत व्हावा या हेतूने मुद्द्दाम क्रांतिकारक आणि देशाचे सैनिक यांच्या जीवनदर्शनासाठी मुद्दाम ड्रामा बनवून राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न असायचा.यासाठी मुद्दामहून आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी किंवा शेजारील गावातील एखादा फौजी जवान बोलावून त्याचा सत्कार स्टेजवर करून घेणे मला आवडायचे.               ‘स्नेहसंमेलनातून सामाजिक जाणीव निर्माण करण्याबरोबरच विद्यार्थी कौशल्य वाढविणे आणि शाळेप्रती समाजाची आस्था वाढविणे हा ‘सुवर्णकांचन योगचं!’ म्हणावा लागेल.’             स्नेहसंमेलनाच्या  तयारीला अगोदरच आम्हा सर्व शिक्षकांवर जबाबदाऱ्या दिलेल्या असायच्या. यामध्ये कार्यक्रमा अगोदर, कार्यक्रम चालू असतांना आणि कार्यक्रम आटोपल्यावर करावयाचे नियोजन केले जायचे. संमेलना अगोदर  इव्हेंट निवडणे, त्याची तय्य्यारी सराव घेणे, वेशभूषा ठरवून प्राप्त करणे, स्वागत गीत निएद्न सराव घेणे, सूत्रसंचालनाची जबाबदारी एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यावर सोपवून विद्यार्थ्यांची रंगीत तालीम घेणे वगैरे नियोजन असायचे .तसेच प्रमुख पाहुणे ठरविणे त्यांना निमंत्रण पत्रिका पाठविणे. वर्षभरातील विद्यर्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी बक्षिस म्हणून प्रमाणपत्र आणि पदकं बनवून घेणे, पिण्याचे पाणी ,रंगमंच व्यवस्था, ध्वनी व प्रकाश व्यवस्था ,स्वागत कमान, रांगोळी रेखाटने, प्रेक्षकांची बैठक व्यवस्था करणे.  वेगवेगळ्या ठिकाणी गरजेनुसार स्वयंसेवक नेमणूक करणे, त्यांना आकर्षक ब्याच देणे.अशी सगळी कामे नियोजित केलेली असायची. कार्यक्रम पूर्ण झाल्यावर साहित्याची सुव्यस्था करणे, आभार मानणे, जमाखर्चाचा हिशोब अहि जबाबदारी आम्हा शिक्षकांवर सोपवून दिलेली असायची. गरज पडेल तिथे शाळा व्यवस्थापन समितीची मदत घ्यायची ठरलेले असायचे.कार्यामाच्या दिवशी बैठक व्यवस्था झालेली आहे आणि प्रेक्षक आलेले आहे हे पाहून अगदी वेळेवरच कार्यक्रमाचे उद्घाटन करायचे या कार्यक्रमासाठी मुद्दामहून एखादा बालसाहित्यिक , ज्यांना बघून आपोआप ग्रामीण प्रेक्षक स्वयंशिस्त बाळगतील यासाठी पोलीस विभागातील एखादा अधिकारी, शाळेचा एखादा विशेष माजी विद्यार्थी, मुद्दामहून शाळा व्यवस्थापन समितीने ठरविलेला दानशूर व्यक्ती जो नक्कीच सर्वांसमोर शाळेला मदत करून समाजाला प्रेरित करेल यासाठी, शिक्षण विभागातील उपलब्धतेनुसार मान्यवर या कार्यक्रमाला बोलावयाचे आणि हो या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येणार नाही यांची मात्र आवर्जून दक्षता घेतलेली असायची. उद्घाटनप्रसंगी शिक्षकानेच संचालन करून यावेळी वर्षभरातील शाळेचा प्रगती आलेख मान्यवर आणि समाजासमोर थोडक्यात ठेवून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून घ्यायचा. “शाळेला गावाचा आधार आसावा आणि गावाला शाळेचा अभिमान आसावा”. यानुसार समाजासमोर शाळा मांडून त्यांना त्याची जाणीव करून द्यायची. नंतर एखाद्या मान्यवरांचे मनोगत घेऊन पाहुण्यांना बैठकीत स्थानापन्न करून, मुख्य कार्यक्रम सुरु व्हायचा. या कार्याक्रमचे सूत्रसंचालन मुद्दाम तय्यारी करवून घेतलेल्या विद्यार्थ्याना करायला लावायचे.               लहान मुलांचे ठेक्यावर पडणारी पाउले आणि बोबड्या भाषेत केलेले अनमोल संवाद नक्कीच प्रेक्षकांच्या ह्रदयाचा ठाव घेणार हे नक्कीच मनात कोरलेलं सत्यात उतरायचं .भरभरून मिळणारा  टाळ्यांचा कडकडाट,विद्यार्थ्यांचे हृदयाला पाझर फोडणारे संवाद, त्यांच्यातील आत्मविश्वास  आणि मिळालेल्या बक्षिस रकमेची यादी स्नेहसंमेलन यशस्वीपणे होत असल्याची नांदीच वाटायची........!लेखन- ज्ञानेश्वर गणपत झगरेस.शिक्षक , जि.प.प्रा.शाळा,उमरखेडा. ता-भोकरदन, जि-जालनामो.नं. ९९२३५२८४९४    x

No comments:

Post a Comment

शिव संवाद.- फेसबुक वरील लाईव्ह कार्यक्रम 'मन करा रे प्रसन्न'

https://m.facebook.com/story.php?story_fbid=177296593607156&id=100977544953592