About Me

My photo
मी एक शिक्षक असून कीर्तन करणे आणि संतविचार समाजात रुजविणे हा माझा प्रयत्न. कथाकथन करण्याची आवड असून लिखाणाची आवड आहे.

Friday, October 18, 2019

वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने..

.(पार्श्वभूमीवर प्रकशित)
      १५ ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन. या महामानवाने आपल्या आयुष्यात अनेक संशोधन करून अवकाश  क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. त्यांच्या कर्तुत्वाच्या आधारावर त्यांना "मिसाईल मैन" म्हणून ओळखल्या जाते. अश्या या अभ्यासू जिद्दी व्यक्तिमत्वाचा जन्मदिन "वाचन प्रेरणा दिन"  म्हणून २०१५ पासून साजरा केला जातो. विविध शाळा, महाविद्यालये, वाचनालये आणि ग्रंथालये या ठिकाणी अनेक वाचानाधारित उपक्रमांचे आयोजन केले जाते. इतर नेत्यांच्या पुण्यतिथीला ,जयंतीला फक्त भाषण आणि संभाषणावर जोर धरणाऱ्या नेत्यांना मात्र आजच्या दिनी का होईना एखादे पुस्तक वाचनाचा योग येत असेल हे त्याचं सौभाग्याच म्हणावं लागेल.
  
डॉ. कलाम यांनी  ‘इंडिया 2020’ या 1996 मध्ये लिहिलेल्या पुस्तकात आपला भारत हा कृषी, विज्ञान, शास्त्र, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात 2020 पर्यंत जगात आघाडीवर असावा, अशी संकल्पना मांडली होती. या पुस्तकाद्वारे त्यांनी देशातल्या विद्यार्थी आणि युवकांना देशाच्या विकासाची आणि रचनात्मक कार्याची स्वप्ने पहा, मोठे व्हा, राष्ट्राला तुमच्या समर्पणाची गरज आहे, असे आवाहन केले होते. डॉ. कलाम यांचे वाचन चौफेर होते. ते इंग्रजी भाषेत लिहीत आणि बोलत. विद्यार्थ्यांना त्यांचे विचार समजत आणि त्या विचाराने विद्यार्थी पेटून ऊठत असत. पंतप्रधानांच्या तांत्रिक सल्लागारपदावर असताना, त्यानंतर आणि राष्ट्रपती झाल्यावर, ते पद सोडल्यावरही डॉ. कलाम यांचे जनजागरणाचे आणि युवाशक्तीला प्रेरित करायचे कार्य अखंडपणे सुरू होते. आठ दहा वर्षे वयाच्या शालेय मुलांच्याबरोबरही ते अत्यंत सहजपणे बोलत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशीही मनमोकळी चर्चा करत. त्यांचा सहवास आणि भाषण ऐकणे हे विद्यार्थ्यांना पर्वणी वाटत असे.  ‘अग्निपंख’ या त्यांच्या आत्मचरित्राचा सर्व भारतीय भाषात अनुवाद झाला. हे पुस्तक विद्यार्थ्यांना आणि युवकांना नवी स्फूर्ती देणारे ठरले आहे. अशा या वाचन प्रिय आणि प्रेरणादायी नेत्याच्या जयंती दिनी राज्यातल्या सर्व शाळात कृतिशीलपणे म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांना वाचनाच्या प्रक्रियेत सध्या सहभागी करून घेतले जात आहे हि अतिशय अभिमानाची बाब म्हणावी लागेल.


     'वाचाल तर वाचाल' हे मर्मवाक्य  अगदी बालपणापासूनच कानपाठ झालेलं असेल,पण नेमकं आपण खरच वाचन करतो का? आणि वाचन करण्याची सवय आपल्याला आहे का? तशी संधी आपल्याला मिळते का ? याचं चिंतन प्रत्येक साक्षर व्यक्तीने करणे अपेक्षित आहे. सध्याच्या या इलेक्ट्रोनिक युगात अनेक प्रसारमाध्यमांचा झपाट्याने प्रसार होताना दिसतोय, प्रत्येक घरात टीवी,इंटरनेट तसेच प्रत्येक हातात मोबाईल सर्रास दृष्टीस पडतोय. यामधून वेळ काढून वाचन करणारे वाचक दुर्मिळच. एकदा का हातातील भ्रमणध्वनी ऊघडला की कित्येक तास त्यावर घालणारे महाभाग पुस्तक वाचा म्हटलं की तोंड पाडतात. तसंही थोडक्या वेळातील व्हिडीओ  बघून त्यावरून बरच काही शिकवणारे टिकटोक सारखी अप्प्स मोबाईल वर उपलब्ध करून देण्याची स्पर्धाच सध्या इलेक्ट्रोनिक माध्यमांत दिसून येत आहे. तरीसुद्धा पुस्तकातून मिळणारे लेखकाचे विचार,त्याची भाषाशैली, लेखकाची समरसता या गोष्टीला मात्र पर्याय मिळूच शकत नाही हे वाचकांनाच पटेल.
    खेळणाऱ्या, मोबाईल ,टीवी पाहणाऱ्या मुलांना "चला रे बस करा आता,घ्या पुस्तक आणि करा अभ्यास" असे म्हणणारे पालक आपल्या पाल्यांदेखत कधी पुस्तक वाचत बसतात का? हा विचार पालकांनी करावा. एका घरात जेव्हा पालक, आई ,आजोबा पुस्तक,वर्तमानपत्र वाचतांना लहान मुलाला दिसते;त्यावेळी ते अज्ञानी बालक सुद्धा आपल्या हातात काहीतरी धरून वाचत असल्याचा आव आणतांना दृष्टीस पडते. याचा अर्थ थोरामोठ्यांनी अगोदर करावे आणि मग फक्त पहावे.. कदाचित त्यांना सांगण्याची गरजच पडनार नाही. प्रत्यक व्यक्तीने आपल्या पाल्यांना आवडत्या विषयाचा अभ्यास करून त्यावर आधारित पुस्तके जर घरात उपलब्ध करून दिली तर नक्कीच पाल्य त्याचे वाचन करेल. खेळ, चित्रपट,पाककला, शेती,विज्ञान,तंत्रज्ञान, आध्यात्म आणि एकंदरीत सगळ्याच विषयाची पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. याचा पुरेपूर वापर करत लग्नसमारंभ,वाढदिवस, भेटीगाठी या कार्यक्रमांत आवर्जून एखादे पुस्तक भेट म्हणून देण्याचा पायंडा पाडवा.
   याच्याही पुढे जाऊन संगणकावर उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांच्या वेबसाईट आवर्जून पाल्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. वाचनात वाचकाच्या आवडीप्रमाणे अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध आहेत परंतु ते त्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. वाचतांना मात्र आपले योग्य विचाराचे असल्याचे वाचकाने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने ठरविणे गरजेचे आहे अन्यथा सध्यस्थितीत अनेक कुविचारी, अश्लील, अराजक  साहित्य सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.
              "पुस्तकाचे गाव भिलार' या गावाची संकल्पना प्रत्यक गावात समजुतीने रुजविण्याचा प्रयत्न व्हावा.   ग्रामपंचायतीने आपल्या गावत आदर्श वाचनालय,ग्रंथालय निर्माण करून त्यामध्ये  गावातील शेतकऱ्यांसाठी कृषी,मत्स्य,कुकुटपालन, विविध लघुउद्योग यावर आधारित  साप्ताहिके,मासिके  उपलब्ध करून द्यावीत. महिलांसाठी पाककला, क्रांतिकारी महिलांची जीवन चरित्र , पारंपारिक गीते,लोककला जोपासणारी पुस्तके येथे उपलब्ध व्हावी,याशिवाय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, शोध निबंध,विविध प्रयोग,खेळ यावर आधारित पुस्तके तर  अनेक कथा, कादंबऱ्या ,प्रवासवर्णने ,नाटके खेड्यातील वाचकांना उपलब्ध करून दिल्यास नक्कीच वाचकांची संख्या वाढून वाचन संस्कृतीचे पुनरुज्जीवन व्हायला सुरवात होईल.

वाचनामुळे  विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना मिळते, नवनवीन शब्दांमुळे त्याच्यात प्रगती होत असते. वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहीती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना निबंध, वकृत्व, लेखन यामध्ये करू शकतो. लेखकांच्या कथा, कादंबरी, ललितलेख, कविता या विषयी माहिती मिळते. आपले सामान्य ज्ञान वाढते. त्याचा उपयोग त्याला भावी जीवनात होऊ शकतो.

आपल्याला जर वाचनाची आवड असेल तर मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यात मदत होते. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो.


           शिक्षक,आई वडील,घरातील मोठी माणसे यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन योग्य पुस्तके वाचली पाहिजेत.वाढदिवस दणक्यात साजरा करण्याऐवजी वाढदिवसाला छान छान पुस्तके वाटली पाहिजेत.दिवाळीला फटाके वाजवण्याऐवजी दिवाळी अंक विकत घेऊन वाचले पाहिजेत.गाव तेथे ग्रंथालय ही लोकचळवळ झाली पाहिजे.आपण स्वतः पुस्तक वाचले पाहिजे व इतरांनाही वाचण्यास प्रोत्साहित केले पाहिजे तरच वाचनसंस्कृती जपता येईल.

  वाचनातून माणूस विचार संपन्न होण्यास मदत होते, वाचण्याने जगातील विचार समजून घेऊन आपल्या जीवनक्रमात त्याचे प्रतिबिंब दिसून येते.शरीराला जशी अन्नाची गरज यशाचं मनाला विचारांची गरज असते आणि हे विचार नक्कीच चांगल्या वाचनातून मिळवता येतात. वाचनाने मनाची भूक पूर्ण होते  आणि वाढते सुद्धा! एकदा वाचनाची सवय जडली तर सतत वृद्धिंगत होत जाते आणि मग  चांगल्या वाचनातून माणूस घडायला वेळ लागत नाही. शेवटी वाचाल तर वाचाल!!!!!!!

 लेखन- श्री.ज्ञानेश्वर झगरे गुरुजी.
              (शिक्षक)

No comments:

Post a Comment

शिव संवाद.- फेसबुक वरील लाईव्ह कार्यक्रम 'मन करा रे प्रसन्न'

https://m.facebook.com/story.php?story_fbid=177296593607156&id=100977544953592