बालक दिनाच्या निमित्ताने ....(पार्श्वभूमीवर प्रकाशित).
आज १४ नोव्हेंबर म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले
पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू अर्थात ‘चाचाजी’ यांचा जन्मदिन. त्यांच्याच जीवनात त्यांना आवडणाऱ्या
लहान बालकांच्या भावविश्वाशी पालकांना जागृत करणारा दिवस. जेमतेम सर्वच देशांमध्ये बालक
दिन साजरा करण्याची पद्धत आहे, त्यामध्ये फक्त तारखांत बदल दिसून येतो. यावरून असे
लक्षात येते कि प्रत्यक मानव समाजाने लहान मुलांना गृहीत न धरता त्यांचा विचार
केला जावा,हि अपेक्षा . लहान मुलांना सुद्धा जगण्यासाठी अन्न,वस्त्र,निवारा
यापेक्षा आणखी बऱ्याच बाबींची अपेक्षा असते.आजकाल ‘लहान मुल म्हणजे मातीचा गोळा’
हि संकल्पना आता इतिहासजमा झालेली असून, प्रत्येक बालकामध्ये काहीना काही विशेष
गुण असतातंच हे सिद्ध झालेलं आहे. त्यांना सुप्त गुण म्हणतात. फक्त बालकांना तशी
उपलब्धी करून देणे गरजेचे आहे, त्यातून ते स्वतः नवीन ज्ञान निर्माण करतात हे
अधोरेखित करावंच लागेल. यातूनच ‘ज्ञानरचनावाद’ या शैक्षणिक संकल्पनेचा उदय झालेला
आहे. यावरून प्रत्येक लहान बालक एक अनमोल निर्मिती आहे असंच म्हणावं लागेल.
आजच्या धकाधकीच्या काळात सर्वच पालकांना आपल्या पाल्याकंडे बघायला वेळ
मिळेलंच का ? हा सुद्धा एक प्रश्नच वाटतो. एकीकडे
धावपळीच्या दुनियेत 'मी मागे राहता कामा नये: यासाठी वाट्टेल ते करून इतरांच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षा समोर जायचंय.' अश्या
विचारांनी ग्रासलेल्या आम्हा डिजिटल वीरांना थोडीजरी उसंत मिळाली तरी हातात मोबाईल घेऊन या आभाषी दुनियेत वावरणाऱ्या
आणि त्यामध्ये सतत गुंतून ठेवणाऱ्या आम्हा पालकांना हल्ली फारसा वेळच मिळत नाही. 'आजकाल डिजिटल मिडीयावर शुभेच्छा देणारे आम्ही प्रत्यक्ष मात्र आपापसात बोलायला सुद्धा टाळतो' हे एक कटू वास्तव आहे. "या इतक्या धावपळीत जगणाऱ्या आई बाबांना,आपल्या पाल्यांसोबत बोलायला आणि
त्यांना समजून घ्यायला आवडले तर, भाग्यंच म्हणावं लागेल त्या पाल्याचं!" त्याहीपेक्षा विशेष
म्हणजे टी.व्ही.,कॉम्पुटर आणि मोबाईलवर गुंतवून ठेवलेल्या अगदी प्ले ग्रुप तसेच नर्सरीच्या अन् शिकवणीच्या ओझ्यानं दबलेल्या बालकाला सुद्धा आपल्या पालकांकडून
काहीतरी शिकावं असं वाटणं जरा इतिहासात जमा झाल्यागतच वाटतंय आता. त्यामुळे या काळात तरी सर्व पालकांना आपल्या पाल्यांप्रती जागरूक करणारा असा ‘बालकदिन’ साजरा होणं फारच गरजेचं असल्याचं
वाटतं.
"करेल मनोरंजन जो मुलांचे , जडेल प्रभुशी नाते
तयांचे." असे म्हणणारे साने गुरुजी आणि त्यांच्या गोष्टीतील संस्कारी जीवन
किंवा ग्रामीण जीवनात अनुभवायला मिळालेले बालजीवन आता नजरेस पडणे जरा अवघडचं. 'एखाद्या लहान बालकाचं, घरात सकाळी उठून मोठ्या भावंडासोबत शुभसकाळ करून काकू किंवा आत्याच्या
हाताने अंघोळ करून, नंतर आजोबांसोबत देवदर्शनाला गावातील मंदिरात जाऊन तेथेच समोर ईतर
बालगोपाळांमध्ये खेळून येऊन, आपल्या आईच्या (मम्मीच्या) हाताने जेवण करून, नंतर बाबासोबत
(पप्पांसोबत) त्यांच्या कामात लुडबुड करून, दिवसभर काहीतरी नवीन शिकून, संध्याकाळी
आजीबाईच्या गोष्टी ऐकून नकळत झोपी जाणं.' हे सगळं आता इतिहासजमा झाल्यागतच वाटतयं. या इतिहासगत झालेल्या
गोष्टींनी बऱ्याच लोकांना आयुष्य जगण्यासाठी हव्या असलेल्या संस्काराचं बळ दिलंय हे सर्वश्रुत आहेच.
'लहान मुल म्हणजे या निर्मिकाने
घरात पाठवलेलं त्याचंच एक रूप'. घरात बाळाचा जन्म म्हणजे आनंदच,पण या काळात मुलांना जन्माला घातल्यावर त्याची जोपासना
कशी करावी याची जबाबदारी ज्यानं त्यानं आपापल्या सोयीनुरूप vवेगळी ठरवलेली असल्याचं हल्ली निदर्शनास
पडतं.. लहान बालकाला जे जे हवं
ते ते देणारे आईबाप आपल्या पाल्याला मात्र योग्य संस्काराचं खतपाणी देत असतीलंच कि नाही? हि खरी शंका आहे. "शुशिलो मातृपुण्येन
,पितृपुण्येन चतुरतः !!" असं मानणाऱ्या या संस्कृतीप्रीय देशात
आपण आपल्या लेकराला संस्कार देतोय का? हा विचार होणं गरजेचा आहे. ‘शुलीलता’ हि आईकडून आणि ‘चतुरता’ हि वडिलाकडून असाच श्लोकाचा
विचार. मग हे लेकराला देण्यासाठी आईवडिलांना विशेष काळजी घेणं अगत्याचं आहे. 'संस्कार' हि काही पाटीवर लिहून किंवा शिकवणी लाऊन पूर्ण करून घेण्याची
प्रक्रिया नाही किंवा फक्त मोबाईलवर विविध कार्टून किंवा गोष्टी बघून मुलं शिकतील असंही नाही. त्यासाठी घरामध्ये मुलांना आपुलकीने सामाऊन घ्यावं लागतं. आपण आपल्या घरात आणि समाजात
आपल्या लेकारांसमक्ष जसं वावरतो, आचरण करतो अगदी तसंच किंबहुना त्यापेक्षा अधिक पुढचं
आचरण लेकरं करतात हा मुद्दामहून डोळ्यामागे टाकलेला सर्वांचा अनुभव वाटतो. जी खेळणी शेजाऱ्याचा मुलाला असेल त्यापेक्षा जास्त सरस खेळणी माझ्या मुलाला
कशी देता येईल ? याचा विचार करणारा बाप, आपल्या मुलाला चांगलं जगण्यासाठी आवश्यक असणारे
संस्कार देईलच असं नाही. "मला हे पाहिजे.. ते पाहिजे.. " असं
सगळं फक्त घेण्याची सवय लागलेल्या मुलांना आपण देण्याची सवय कधी लावणार? यासाठी
जुन्या कुटुंबव्यवस्थेत सहज होणारी संस्कारी देवान घेवाण आता कुठून विकत आणता येईल का ? यासाठी पालक मानून काय करावे लागेल? याचा विचारसुद्धा बालकदिनी होणे गरजेचे आहे.
आजकाल आपल्या मुलाला आपण कुठे पाठवतो? तो आपला
वेळ कुठे घालतो? आपला मुलगा मोबाईल आणि संगणकावर काय पाहतो? कोणत्या मित्रांसोबत जातो?
या सगळ्या प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊन पालकांनी आपल्या मुलांना योग्य दिशेने मार्गक्रमण
करणे गरजेचे आहे. 'मुले हि राष्ट्राची खरी संपत्ती आहे'. असे मानणाऱ्या नेहरूजींना
या संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन करणे अति महत्वाचे वाटायचे. तसेच युनो या जागतिक
संघटनेला सुद्धा महत्वाचे वाटल्याने संपूर्ण विश्वात बालकदिन साजरा केला जातो. विविध
व्यसनांच्या विळख्यात जाणाऱ्या लहान मुलांना रोखण्यासाठी पालकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. व्यसन करणे वाईट असते असे सांगतांना स्वतः
पालकाने सुद्धा निर्व्यसनी असणे किंवा निदान पाल्यासमोर तरी व्यसन न करणे हे अपेक्षित
असते. स्वतः तासनतास मोबाईल पाहत बसणाऱ्या पालकांना 'आपल्या पाल्याने मोबाईल पाहू नये' असे वाटणे म्हणजे केवळ ‘मृगजळच’ मानावे.
'आपल्या स्वतःच्या बालाकाविषयी जशी आपली जबाबदारी ठरते, तशीच आपल्या सभोवताली राहणाऱ्या इतर बालकांचा सुद्धा मानव या
नात्याने विचार व्हावा' याकरिता सुद्धा बालकदिन अत्यंत महत्वाचा आहे. जन्माला येणारं
प्रत्येक बाळ अत्यंत महत्वाचं आहे, याचाच परिपाक म्हणून, बाळ जन्माला येण्याच्या अगोदरपासुनच म्हणजे आईच्या गर्भात असलेल्या
गर्भाचे पोषण करण्यासाठी आजकाल अनेक यंत्रणा सज्ज असल्याचे निदर्शनास पडते. यामध्ये
गावातील आशाताई, अंगणवाडी ताई , आरोग्य सेविका ते अगदी महिला बालआयोगा पर्यंत सर्वांचे
प्रयत्न चालू असतांना आजही बालमृत्यू आणि बालकुपोषणाचे चित्र सतत निदर्सानास
येत आहे. 'एकीकडे काय काय खावे? असा प्रश्न तर, दुसरीकडे काय खावे? असा प्रश्न' आज
समाजात उभा असल्याचे दिसत आहे. कचऱ्यातील शिळे अन्न वेचून खाणारी बालके हे आजच्या परिस्थितीचे
विदारक चित्र समाजासमोर मांडतात. वाढती बालगुन्हेगारी आणि बालमजुरी हे सध्याचे
बालविश्वातील प्रश्न आ वासून उभे असतांना; आता यासाठी अगदी सामान्य माणसांपासून
ते सर्वोच्च प्रशासन आणि शासनाने काय उपाय करता येईल याचे चिंतन करणे गरजेचे आहे. अगदी १९८६ पासून लागू
करण्यात आलेला ‘बालमजुरी प्रतिबंध कायदा’ अजूनही बालमजुरी का थांबवू शकला नाही? हा सुद्धा चिंतन आणि चिंता करण्याचा प्रश्न आहे.
‘आजचं बालक हे उद्याचे आपले आणि आपल्या देशाचे भविष्य आहे’. म्हणून अश्या बालकांना उत्तम आहार,आरोग्य, शिक्षण आणि संस्कार देणे हे
सुजाण पालक आणि सुज्ञ समाजाचे आद्य कर्तव्य आहे त्यादृष्टीने 'बालकाचा विचार' आणि 'बालविकास' व्हावा हीच अपेक्षा........
लेखन- श्री ज्ञानेश्वर गणपत झगरे
( शिक्षक तथा कीर्तनकार ) प्रा शा उमरखेडा.

No comments:
Post a Comment