About Me

My photo
मी एक शिक्षक असून कीर्तन करणे आणि संतविचार समाजात रुजविणे हा माझा प्रयत्न. कथाकथन करण्याची आवड असून लिखाणाची आवड आहे.

Wednesday, November 13, 2019

“आजच्या बालक दिनी तरी माझं ऐकेल का कुणीतरी ?”


आजच्या बालक दिनी तरी माझं ऐकेल का कुणीतरी ?”

“मी एक बालक......

अहो कोणी माझ्याकडे पाहिल का जरा !
हो हो माझ्याकडेच ....
आज तुम्ही मोठ्या थाटामाटात आम्हां  बालकांचा उदोउदो करून बालकदिन साजरा करत आहात नं......
थ्यांकू म्हणावं वाटतं नेहरूजींना, आम्ही लहान मुलं आणि फुलं फारच आवडायची म्हणे त्यांना ..... !
पण आजतरी कोणी पाहील का माझ्याकडे ?
अहो एकीकडे तुम्ही मोठ्या इमारतींमध्ये राहून उंच भारी भारी कपडे घालून मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये बसून जाऊन उंच उंच इमारतीच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांसाठी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत आहात पण आम्हीही काही लहान मुलं अशी आहोत कि आम्हाला ना राहायला व्यवस्थित घर, न खायला काही उपलब्ध... अंगात घालायच्या कपड्याविषयी न सांगितलेलंच बरं . कोणास ठाऊक आमच्या मायबापांना आमच्या विषयी फारशी काळजी वाटत नसेल कि मुद्दाम त्यांची परिस्थिती आमच्याकडे पाहण्यासारखी नसेल? ते काहीही असो पण आमची पुरी हेळसांड चाललीये हे आज तुम्हांला सांगावं वाटतयं....
आमचं घर म्हणजे कसं अगदी कपड्याचा पाल कधीही उचलावा आणि कोठेही मांडावा... त्यामुळं आमचं नेमकं गाव कोणतं आहे हे अजून तरी मला सांगता येत नाही. माझा जन्म अचूक कोठे झाला असावा हे तसं माझ्या आईलापण सांगता येत नाही. कोणत्यातरी गावी माय सुया,पोत, मणी विकायला गेली होती,तिथच तीचं पोट दुखायला लागलं अन मग माझा बाबा तिला आपल्या खांद्यावर  घेऊन लांब रानात असलेल्या आमच्या पालात घेऊन आलाय अन तिथं कुठ म्हणे माझा जन्म झालाय. कसला आलाय डॉक्टर अन कसली आली दायीन, सुयीन ? माझ्याच आईनं मला थंड्या पाण्यानं पहिली अंघोळ घालून तंदुरुस्त केलं असं अजूनही म्हणती ती. तिथं कसली आलीय बाळंतपणात पत अन सलाईन ? अहो त्यावेळी माझ्या मोठ्या बहिणीनं गावातून भिक मागून आणलेले शिळे कुटके हीच माझ्या आईची पत होती.
नंतर तिचा सांगण्यावरून मला कधी ताप, खोकला आला तर ती उतळनिचा पाला मला पाजायची अन अजूनही कधी मला काही दुखायला लागलं कि असच काहीतरी रानातलं पाजल्या जातंय. मी आता जेमतेम पाच वर्षाचा झालो आसन पण अजून माझा वाढदिवस कधी साजरा केला जात नाही कि अजून मला नवा ड्रेस घेतल्याचं मला कळत नाही. मागील वर्षापासून मला माझ्या मोठ्या बहिणीसोबत गावोगावी भिक मागायला जावं लागतं. दररोज वेगळ्या गल्लीत जावं अन त्या गल्लीतील प्रत्येक घरासमोर उभं राहून “ भाकर वाढे माय....” असा आवाज करायचा हाच माझा आता नित्याचा दिनक्रम झालाय. काही घरातील माणसं मोठ्या मनानं वाढतात तर काही फक्त शिव्याच घालतात. कदाचित माझ्या अंगातले फाटके कपडे अन माझ्या चेहऱ्यावरील मळकेपणा त्यांना किळसवाणा वाटत असेल. पण माझा नाईलाज, मी कुठ्न आणणार माझ्यासाठी साबण अन्न वीन कपडा? ‘असंच कुणीतरी दारावर आल्यावर सुईच्या बदल्यात एखादं जुनं आंगडं, टोपडं दिलं तर हीच माझी दिवाळी अन् कोणी घरातील उरलेली एखादी शिळी पोळी दिली तर हीच माझी होळी.’  
एखाद्या ठिकाणी लग्न समारंभ असला तर मात्र आमच्यासाठी आनंदाचा सण असतो बरकां . आम्हाला तसा कोणत्याच समारंभाच्या मंडपात प्रवेश नसतो; पण त्यामधील फेकलेल्या उष्ट्या पात्रावरील मिळालेलं जेवण सुद्धा अप्रतिमच असतं आमच्यासाठी. खूपच मजा मारून खातो आम्ही अन् उरलेलं आमच्या आई बाबांसाठी सुद्धा आवर्जून आणतो, आणि असे गोडधोड त्यांना दिल्यावर माझी म्हातारी आजी मात्र जाम खुश होऊन माझा मुका घेते बरकां! अन् म्हणते, “माझा नातू लय  मोठा राजा माणूस हाय, माझ्यासाठी मस्त सुगंधित भात आणतो.” तेव्हा आपली छाती जास्तंच  फुगल्यासारखं वाटतं मला.  
माझे आईबाबा काय करत असतील? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलां असेल.. अहो माझ्या आईबाबांना ना घर ना घरकुल.. न शेती ना नोकरी ... न कोण्ही सोयरा मोठा ना कोणी नेता पाठीराखा ... असेच उठतात या गावावरून त्या गावाला ... माझी आई सुई,पोत,मणी, दोरा ,फणी विकते अन् बाप विकतो बाळ्या बुगड्या. “आजकाल शहरात मोठी मोठी दुकान असल्याने आमचा फारसा धंदा चालत” नाही असं नेहमीच ऐकत असतो मी त्यांच्या तोंडून. त्यामुळेच कि काय देव जाणे माझे बाबा नेहमीच दारू पितात अन् मग नेहमीच त्यांच्यात वाद होतात. पण.... यामध्ये माझा काय दोष असेल हो??? मी आजूबाजूला मोठ्या थाटात राहणाऱ्या तुमच्या लेकरांना पाहतो आणि मनातच रडत कुढत असतो... देवा मला जास्त श्रीमंती नको पण या काळात निदान खायला अन्न अन राहायला घर तरी असावं, तुमचे ते मोठ्या पोशाखातील मुलं पाहून मला सुद्धा शाळेत जावं वाटतं, मला पण एखादी खेळणी मिळायला तर आवडेलच न मला .... मला माहित आहे आजकाल म्हणे शाशनाने फार मोठ्या योजना निर्माण केल्यात आमच्या सारख्या लहानग्यांसाठी अन् आमच्या सारख्या जमातीसाठी .. पण अश्या दररोज घर आणि जागा बदलणाऱ्या आम्हा बालकांना अन् आमच्या पालकांना कधी माहिती होणार अन कधी मिळणार??

              १९८६ साली बालमजुरी रोखण्यासाठी कायदा करण्यात आला  आणि त्याअनुशंघाने १९८७ साली विशिष्ट पॉलिसि पण बनवण्यात आली म्हणतात आमच्या सारख्या बालमजुरांसाठी; पण अजूनही कुठं पूर्णतः बालमजुरी बंद झाली का?  नाही झाली हो.  माझे अनेक बांधव आजही विविध हॉटेलमध्ये, वीट भट्टीवर, शेतात आणि  फुटपाथवर पोटासाठी आणि समज नसलेल्या पालकांच्या अडानीपणामुळे काम करतांना नक्कीच तुम्हाला दिसत असतील.. आणि हो यातूनच नाईलाजाने अनेक आमचे बांधव गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जातात व बालगुन्ह्यात सुद्धा फसतात बरं का ! पण तुम्हाला आमची कुठे काळ्जी वाटते म्हणा?  तुम्ही फक्त मस्त मोबाईलवर बालकदिनाच्या शुभेच्छा देणार बस्स...!
जाउद्या माझ्या फार मोठ्या अडचणी अन समस्या आहे .. कारण मी आजही उपेक्षित आहे; पण खूप मोठ्या आशेनं आज मी या बालकदिनी तुम्हाला आवाहन करतोय कि, ‘तुम्हीच व्हा आमचे पालक अन तुम्हीच व्हा आमचे तारणहार ... आमच्यासारखे ईकडे तिकडे भटकतांना दिसले तर त्यांना सांगा काही शासनाच्या योजनांविषयी अन् त्यांच्या लेकरांना ते जिथे पोहचतील त्याच गावातील शाळेत आवर्जून बोलवा. द्या त्यांना एखादे नवे कपडे घालायला किंवा द्या त्यांना पाटीपुस्तक..... आणि हो काहीच नाही देता आलं तर निदान फारच खालच्या थरातलं वंगाळ बोलून हिणवू तरी नका..... हाच आमचा अपेक्षेचा बालकदिन बघा साजरा करून.!!!”    आपलाच- एक असाही बालक.


लेखन-ज्ञानेश्वर गणपत झगरे
(शिक्षक तथा किर्तनकार) मो.नं.९९२३५२८४९४
जि.प.प्रा शाळा ,उमरखेडा, त-भोकरदन,जि.जालना  

No comments:

Post a Comment

शिव संवाद.- फेसबुक वरील लाईव्ह कार्यक्रम 'मन करा रे प्रसन्न'

https://m.facebook.com/story.php?story_fbid=177296593607156&id=100977544953592