About Me

My photo
मी एक शिक्षक असून कीर्तन करणे आणि संतविचार समाजात रुजविणे हा माझा प्रयत्न. कथाकथन करण्याची आवड असून लिखाणाची आवड आहे.

Saturday, November 23, 2019

अध्ययन निष्पत्ती


अध्ययन निष्पत्ती मराठी प्राथमिक स्तर

       शाळेत येताना मुले आपल्याबरोबर खूप काही घेऊन येत असतात. जसे-आपली भाषा, आपले अनुभव आणि जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन इत्यादी. मुले घरातून तसेच परिसरातून जे अनुभव आपल्याबरोबर घेऊन शाळेत येतात ते खूप समृद्ध असतात. त्यांच्या या भाषिक संपत्तीचा वापर भाषा शिकणे व शिकवणे यांसाठी केला गेला पाहिजे. पहिल्या वेळेस शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांस अनेक शब्दांचे अर्थ व त्याच्या प्रभावाची माहिती असते. लिपीबद्ध चिन्ह आणि त्याच्याशी संबंधित स्वर/ध्वनी हे विद्यार्थ्यांसाठी अमूर्त स्वरूपात असतात म्हणून शिकण्याची सुरुवात अर्थपूर्ण साहित्यातून व्हायला हवी, विशिष्ट उद्दिष्टांसाठी व्हायला हवा. हा उद्देश कथा ऐकून-वाचून आनंद घेणे हाही असू शकतो. हळूहळू मुलांना भाषेची लिपी माहीत झाली, की त्यातून त्यांच्यात आपल्या परिसरात असणाऱ्या उपलब्ध लिखित भाषा समजण्यासाठीची कुतूहलताही निर्माण होते. भाषा शिकणे-शिकवणे या प्रक्रियेचे मूळ हे मुलांच्या बाबतीत असे असते, की मुले आपल्या समोरील जगाशी संबंधित आपली समज आणि ज्ञान स्वत: निर्माण करतात. या ज्ञानाची निर्मिती कोणाच्या शिकवण्यातून किंवा कोणाच्या दबावातून होत नसून मुलांच्या स्वत:च्या अनुभवांतून आणि आवश्यकतेनुसार होत असते. यासाठी मुलांना असे वातातवरण मिळणे आवश्यक आहे, की जिथे ते आपल्या आवडीनुसार आपल्या परिसरातील अनुभवांचा शोध घेऊ शकतील. हीच गोष्ट मुलांच्या भाषिक क्षमतांबाबतही लागू होते. 
                           शाळेत आल्यावर सुरुवातीला मुले बिनधास्तपणे, मुक्तपणे अभिव्यक्त होऊ शकत नाहीत, कारण ज्या भाषेत ते सहज प्रकारे आपले मत, अनुभव, भावना इत्यादी व्यक्त करू पाहतात, त्या सुरुवातीला शाळेत स्वीकृत/मान्य होत नाहीत. भाषा शिक्षणात बहुभाषिक संदर्भ लक्षात घेणे हे देखील आवश्यक आहे. विविध प्रकारच्या भाषिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी वर्गात येत असतात. वर्गात या मुलांचे स्वागत केले पाहिजे, कारण त्यांच्या भाषेला नाकारण्याचा अर्थ म्हणजे त्यांच्या अस्मितेला नाकारणे होय. प्राथमिक स्तरावर भाषा शिकणे व शिकवणे यासंबंधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुलांना भिन्न प्रकारच्या परिचित आणि अपरिचित संदर्भानुसार भाषेचा योग्य वापर करता येणे होय. त्यातूनच ते सहजपणे, कल्पकतेने, प्रभावीपणे आणि व्यवस्थितपणे लेखन करू शकतील, भाषेला प्रभावी बनवण्यासाठी योग्य शब्दांचा उपयोग करू शकतील, श्रवण, भाषण-संभाषण, वाचन, लेखन या चारही प्रक्रियांमध्ये मुले आपल्या पूर्वज्ञानाच्या मदतीने अर्थपूर्ण रचना करू शकतील, तसेच ऐकलेल्या गोष्टींसंबंधी अर्थ लावू शकतील. अध्ययन निष्पत्ती संबंधी पुढील भागात अध्ययन घटकासंदर्भात विविध गोष्टींवर लक्ष दिले आहे. त्यानुसार अध्ययनहे पाठ्यपुस्तकी कौशल्य न राहता एक योजना व युक्ती असावी. वाचणे, वाचून समजणे आणि त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे ही एक प्रक्रिया आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर आपण हे म्हणू शकतो, की अध्ययन करणे ही एक अर्थपूर्ण प्रक्रिया आहे. आपण असेही म्हणू शकतो, की मुद्रित/छापील किंवा लिखित साहित्यांतून काही संदर्भ व अनुमान यांवरून अर्थ लावण्याचाप्रयत्न करणे म्हणजेच अध्ययनहोय. आपण पाठ्यसाहित्य वाचताना बऱ्याच वेळा काही महत्त्वाच्या घटकांच्या बाबतीत आवश्यक तेथे त्याच्यापुढील घटकांचा संदर्भ समजण्यासाठी मागील भाग पुन्हा वाचतो. वाचण्याच्या या पुनरावृत्तीस अर्थाचा शोधम्हणूनही पाहिले जाते. वाचताना, अर्थ लावताना या गोष्टीही लक्षात ठेवणे आवश्यक आहे, की अर्थ हा केवळ शब्द आणि दिलेल्या वाक्यातच असत नाही, तर पाठाच्या संपूर्ण आशयावरही अवलंबून असू शकतो आणि त्यासाठी बऱ्याच वेळा त्यामध्ये जे स्पष्टपणे दिलेले नसते, तेही समजून घेण्याची आवश्यकता असते.
             
                     कोणत्याही वाचन साहित्याची एक स्वतंत्र संरचना असते आणि या साहित्याच्या संरचना लक्षात ठेवणे हे परिचित अर्थांच्या माध्यमातून साहाय्यक ठरते. लिहिणे ही अर्थपूर्ण प्रक्रिया तेव्हा बनू शकेल जेव्हा मुलांना आपली भाषा, आपली कल्पना, आपली दृष्टी यांद्वारे लिहिण्याचे स्वातंत्र्य मिळेल. मुलांना अशी संधी मिळावी, की ज्यातून ते आपली भाषा आणि शैली विकसित करू शकतील. फळ्यावरील लिहिणे, पुस्तकातून लिहिणे तसेच शिक्षकांनी लिहिलेले उतरवणे यांतून मुलांना स्वतंत्र लिहिण्याची संधी मिळणार नाही. आपली पाठ्यपुस्तके अभ्यासून, वाचून शिकावीत किंवा पाठ्यपुस्तकांतील आलेल्या विविध पाठांच्या शेवटी दिलेले प्रश्न लिहावेत, हा वाचणे व लिहिणे या संदर्भातील शिकण्याचा एकमेव उद्देश नाही; याउलट मुले आपल्या दैनंदिन जीवनात वाचणे व लिहिणे या कौशल्यांचा योग्य वापर करू शकतील, हाच याचा उद्देश आहे. वाचणे व लिहिणे या प्रक्रिया शिकण्यात ही गोष्टही समाविष्ट व्हावी, की विविध उद्देशांसाठी वाचणे आणि लिहिण्याच्या पद्धती यांमध्ये अंतर असावे. आपल्या वाचण्याचा उद्देश काय आहे यावर आपल्या वाचण्याची पद्धत अवलंबून असते. एखादी बातमी वाचणे आणि एखादी सूचना वाचणे यांच्या पद्धतींत फरक असतो. लेखनाच्या बाबतीतही हे लक्षात घेणे जरुरी आहे, की आपला वाचककोण आहे, अर्थात आपण कोणासाठी लिहित आहोत. जर आपल्या शाळेत क्रीडास्पर्धासंबंधी सूचना लावायची असेल तर त्याचा वाचक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचारी असतील, मात्र हीच सूचना जर परिसरातील इतर व्यक्तींसाठी असेल तर परिसरातील व्यक्ती या वाचकम्हणून त्यात समाविष्ट होतील. या दोन्हीही परिस्थितींत लेखनाच्या पद्धतीत आणि भाषेत बदल होणे स्वाभाविक आहे. याचप्रकारे विविध प्रकारचे साहित्य वाचण्याचा उद्देश हा वाचण्याच्या पद्धतीवर आधारित आहे. आपल्या शाळेच्या सूचनाफलकावरील शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सूचना वाचताना आपले लक्ष काही ठराविक मुद्द्यांकडे जाते. जसे- कार्यक्रमाची तारीख काय आहे, कार्यक्रम कोठे आयोजित केला जाणार आहे, कार्यक्रमाची वेळ काय आहे इत्यादी. गोष्ट वाचून त्यातील पात्र आणि घटनाक्रमासंबंधी बारकाईने विचार करताना आपण विचार करतो, की असे झाले तर ते का झाले, गोष्टीत असे काय आहे, जे नसते तर गोष्टीचे स्वरूप काय असते इत्यादी. आपले वाचणे आणि लिहिणे यांचे अनेक आयाम आहेत, अनेक टप्पे आहेत आणि प्रत्येक टप्पा आपापल्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. या सर्वांस वर्गात योग्य स्थान मिळणे आवश्यक आहे. प्राथमिक स्तरावर मुलांकडून ही अपेक्षा ठेवली जाते, की त्यांनी ऐकलेली किंवा लिहिलेली गोष्ट यांवर स्वत:ची प्रतिक्रिया व्यक्त करू शकतील आणि प्रश्न विचारू शकतील. मुलांची भाषा या गोष्टीचे प्रमाण आहे, की त्यांना आपल्या भाषेच्या व्याकरणाची चांगल्या प्रकारे जाणीव व्हावी. विविध पाठांच्या संदर्भात आणि आसपासच्या परिसराशी संबंधी भाषेच्या 56 उच्च प्राथमिक स्तरावरील अध्ययन निष्पत्ती व्याकरणाची जोडणी करणे आवश्यक आहे. भाषेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रूपांकडे त्यांचे लक्ष वेधणेही आवश्यक आहे, कारण त्यांतून ते भाषेतील बारकावे समजू शकतील आणि स्वत:च्या भाषेत त्यांचा योग्य प्रकारे वापर करू शकतील. एका स्तरावर होणाऱ्या प्रक्रियेचा वापर त्यापुढील स्तरांवरील इयत्तांच्या संदर्भात केला जाऊ शकतो. हाच विचार भाषा शिकणे आणि शिकवणे या प्रक्रियांसंबंधी आणि वातावरणासंबंधीही विचारात घेणे आवश्यक आहे. इयत्तानिहाय किंवा स्तरांनुसार मनोरंजक विषयांवर आधारित साहित्याचा वापर केला जावा, ज्यातून मुलांना भाषेच्या विविध शैली परिचित होतील आणि त्याचा प्रभावी वापर करण्याची संधी मिळेल. मनोरंजक आणि वैविध्यपूर्ण बालसाहित्यास विशेष महत्त्व आहे. 
                             भाषेसंबंधी सर्व क्षमता जसे-श्रवण, भाषण-संभाषण, वाचन, लेखन या एकमेकांशी संबंधित असतात आणि एकमेकांच्या विकासासाठी साहाय्यकही ठरतात. अंतिमत: त्यांना वेगवेगळ्या स्वरूपांत पाहणे हे योग्य नाही. येथे हे समजणेही आवश्यक आहे, की मराठी भाषेसंबंधी जे अध्ययन निष्पत्तीचे घटक दिले आहेत ते परस्परसंबंधित आहेत आणि एकापेक्षा अधिक भाषिक क्षमतांची छबी त्यात पाहायला मिळते. कोणतेही साहित्य ऐकून किंवा वाचून त्यावर सखोल चर्चा करणे, आपली प्रतिक्रिया व्यक्त करणे, प्रश्न विचारणे हे वाचण्याच्या क्षमतेशी संबंधित आहे आणि ऐकणे आणि बोलणे यांच्याशीही संबंधित आहे. प्रतिक्रिया, प्रश्न, टिपण लिहूनही अभिव्यक्त होता येऊ शकते. याप्रकारे भाषेच्या वर्गात एकत्रित ऐकणे, बोलणे, वाचणे व लिहिणे अपेक्षित आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता पाठ्यक्रमासंबंधी अपेक्षा, अध्ययन सुचवलेली शैक्षणिक प्रक्रिया तसेच अध्ययनासंबंधी निष्पत्ती दर्शवणारे घटक/मुद्देदिलेले आहेत. पाठ्यक्रमासंबंधी अपेक्षांची पूर्ती होण्यासाठी अध्ययनसंदर्भातील प्रक्रियांचीही महत्त्वाची भूमिका आहे. अध्ययनास उपयुक्त प्रक्रियांशिवाय संबंधित अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त होऊ शकणार नाही.



Wednesday, November 13, 2019

“आजच्या बालक दिनी तरी माझं ऐकेल का कुणीतरी ?”


आजच्या बालक दिनी तरी माझं ऐकेल का कुणीतरी ?”

“मी एक बालक......

अहो कोणी माझ्याकडे पाहिल का जरा !
हो हो माझ्याकडेच ....
आज तुम्ही मोठ्या थाटामाटात आम्हां  बालकांचा उदोउदो करून बालकदिन साजरा करत आहात नं......
थ्यांकू म्हणावं वाटतं नेहरूजींना, आम्ही लहान मुलं आणि फुलं फारच आवडायची म्हणे त्यांना ..... !
पण आजतरी कोणी पाहील का माझ्याकडे ?
अहो एकीकडे तुम्ही मोठ्या इमारतींमध्ये राहून उंच भारी भारी कपडे घालून मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये बसून जाऊन उंच उंच इमारतीच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांसाठी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत आहात पण आम्हीही काही लहान मुलं अशी आहोत कि आम्हाला ना राहायला व्यवस्थित घर, न खायला काही उपलब्ध... अंगात घालायच्या कपड्याविषयी न सांगितलेलंच बरं . कोणास ठाऊक आमच्या मायबापांना आमच्या विषयी फारशी काळजी वाटत नसेल कि मुद्दाम त्यांची परिस्थिती आमच्याकडे पाहण्यासारखी नसेल? ते काहीही असो पण आमची पुरी हेळसांड चाललीये हे आज तुम्हांला सांगावं वाटतयं....
आमचं घर म्हणजे कसं अगदी कपड्याचा पाल कधीही उचलावा आणि कोठेही मांडावा... त्यामुळं आमचं नेमकं गाव कोणतं आहे हे अजून तरी मला सांगता येत नाही. माझा जन्म अचूक कोठे झाला असावा हे तसं माझ्या आईलापण सांगता येत नाही. कोणत्यातरी गावी माय सुया,पोत, मणी विकायला गेली होती,तिथच तीचं पोट दुखायला लागलं अन मग माझा बाबा तिला आपल्या खांद्यावर  घेऊन लांब रानात असलेल्या आमच्या पालात घेऊन आलाय अन तिथं कुठ म्हणे माझा जन्म झालाय. कसला आलाय डॉक्टर अन कसली आली दायीन, सुयीन ? माझ्याच आईनं मला थंड्या पाण्यानं पहिली अंघोळ घालून तंदुरुस्त केलं असं अजूनही म्हणती ती. तिथं कसली आलीय बाळंतपणात पत अन सलाईन ? अहो त्यावेळी माझ्या मोठ्या बहिणीनं गावातून भिक मागून आणलेले शिळे कुटके हीच माझ्या आईची पत होती.
नंतर तिचा सांगण्यावरून मला कधी ताप, खोकला आला तर ती उतळनिचा पाला मला पाजायची अन अजूनही कधी मला काही दुखायला लागलं कि असच काहीतरी रानातलं पाजल्या जातंय. मी आता जेमतेम पाच वर्षाचा झालो आसन पण अजून माझा वाढदिवस कधी साजरा केला जात नाही कि अजून मला नवा ड्रेस घेतल्याचं मला कळत नाही. मागील वर्षापासून मला माझ्या मोठ्या बहिणीसोबत गावोगावी भिक मागायला जावं लागतं. दररोज वेगळ्या गल्लीत जावं अन त्या गल्लीतील प्रत्येक घरासमोर उभं राहून “ भाकर वाढे माय....” असा आवाज करायचा हाच माझा आता नित्याचा दिनक्रम झालाय. काही घरातील माणसं मोठ्या मनानं वाढतात तर काही फक्त शिव्याच घालतात. कदाचित माझ्या अंगातले फाटके कपडे अन माझ्या चेहऱ्यावरील मळकेपणा त्यांना किळसवाणा वाटत असेल. पण माझा नाईलाज, मी कुठ्न आणणार माझ्यासाठी साबण अन्न वीन कपडा? ‘असंच कुणीतरी दारावर आल्यावर सुईच्या बदल्यात एखादं जुनं आंगडं, टोपडं दिलं तर हीच माझी दिवाळी अन् कोणी घरातील उरलेली एखादी शिळी पोळी दिली तर हीच माझी होळी.’  
एखाद्या ठिकाणी लग्न समारंभ असला तर मात्र आमच्यासाठी आनंदाचा सण असतो बरकां . आम्हाला तसा कोणत्याच समारंभाच्या मंडपात प्रवेश नसतो; पण त्यामधील फेकलेल्या उष्ट्या पात्रावरील मिळालेलं जेवण सुद्धा अप्रतिमच असतं आमच्यासाठी. खूपच मजा मारून खातो आम्ही अन् उरलेलं आमच्या आई बाबांसाठी सुद्धा आवर्जून आणतो, आणि असे गोडधोड त्यांना दिल्यावर माझी म्हातारी आजी मात्र जाम खुश होऊन माझा मुका घेते बरकां! अन् म्हणते, “माझा नातू लय  मोठा राजा माणूस हाय, माझ्यासाठी मस्त सुगंधित भात आणतो.” तेव्हा आपली छाती जास्तंच  फुगल्यासारखं वाटतं मला.  
माझे आईबाबा काय करत असतील? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलां असेल.. अहो माझ्या आईबाबांना ना घर ना घरकुल.. न शेती ना नोकरी ... न कोण्ही सोयरा मोठा ना कोणी नेता पाठीराखा ... असेच उठतात या गावावरून त्या गावाला ... माझी आई सुई,पोत,मणी, दोरा ,फणी विकते अन् बाप विकतो बाळ्या बुगड्या. “आजकाल शहरात मोठी मोठी दुकान असल्याने आमचा फारसा धंदा चालत” नाही असं नेहमीच ऐकत असतो मी त्यांच्या तोंडून. त्यामुळेच कि काय देव जाणे माझे बाबा नेहमीच दारू पितात अन् मग नेहमीच त्यांच्यात वाद होतात. पण.... यामध्ये माझा काय दोष असेल हो??? मी आजूबाजूला मोठ्या थाटात राहणाऱ्या तुमच्या लेकरांना पाहतो आणि मनातच रडत कुढत असतो... देवा मला जास्त श्रीमंती नको पण या काळात निदान खायला अन्न अन राहायला घर तरी असावं, तुमचे ते मोठ्या पोशाखातील मुलं पाहून मला सुद्धा शाळेत जावं वाटतं, मला पण एखादी खेळणी मिळायला तर आवडेलच न मला .... मला माहित आहे आजकाल म्हणे शाशनाने फार मोठ्या योजना निर्माण केल्यात आमच्या सारख्या लहानग्यांसाठी अन् आमच्या सारख्या जमातीसाठी .. पण अश्या दररोज घर आणि जागा बदलणाऱ्या आम्हा बालकांना अन् आमच्या पालकांना कधी माहिती होणार अन कधी मिळणार??

              १९८६ साली बालमजुरी रोखण्यासाठी कायदा करण्यात आला  आणि त्याअनुशंघाने १९८७ साली विशिष्ट पॉलिसि पण बनवण्यात आली म्हणतात आमच्या सारख्या बालमजुरांसाठी; पण अजूनही कुठं पूर्णतः बालमजुरी बंद झाली का?  नाही झाली हो.  माझे अनेक बांधव आजही विविध हॉटेलमध्ये, वीट भट्टीवर, शेतात आणि  फुटपाथवर पोटासाठी आणि समज नसलेल्या पालकांच्या अडानीपणामुळे काम करतांना नक्कीच तुम्हाला दिसत असतील.. आणि हो यातूनच नाईलाजाने अनेक आमचे बांधव गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जातात व बालगुन्ह्यात सुद्धा फसतात बरं का ! पण तुम्हाला आमची कुठे काळ्जी वाटते म्हणा?  तुम्ही फक्त मस्त मोबाईलवर बालकदिनाच्या शुभेच्छा देणार बस्स...!
जाउद्या माझ्या फार मोठ्या अडचणी अन समस्या आहे .. कारण मी आजही उपेक्षित आहे; पण खूप मोठ्या आशेनं आज मी या बालकदिनी तुम्हाला आवाहन करतोय कि, ‘तुम्हीच व्हा आमचे पालक अन तुम्हीच व्हा आमचे तारणहार ... आमच्यासारखे ईकडे तिकडे भटकतांना दिसले तर त्यांना सांगा काही शासनाच्या योजनांविषयी अन् त्यांच्या लेकरांना ते जिथे पोहचतील त्याच गावातील शाळेत आवर्जून बोलवा. द्या त्यांना एखादे नवे कपडे घालायला किंवा द्या त्यांना पाटीपुस्तक..... आणि हो काहीच नाही देता आलं तर निदान फारच खालच्या थरातलं वंगाळ बोलून हिणवू तरी नका..... हाच आमचा अपेक्षेचा बालकदिन बघा साजरा करून.!!!”    आपलाच- एक असाही बालक.


लेखन-ज्ञानेश्वर गणपत झगरे
(शिक्षक तथा किर्तनकार) मो.नं.९९२३५२८४९४
जि.प.प्रा शाळा ,उमरखेडा, त-भोकरदन,जि.जालना  

बालक दिनाच्या निमित्ताने


बालक दिनाच्या निमित्ताने ....(पार्श्वभूमीवर प्रकाशित).

                आज १४ नोव्हेंबर म्हणजे  स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू अर्थात चाचाजी यांचा जन्मदिन. त्यांच्याच जीवनात त्यांना आवडणाऱ्या लहान बालकांच्या भावविश्वाशी पालकांना जागृत करणारा दिवस. जेमतेम सर्वच देशांमध्ये बालक दिन साजरा करण्याची पद्धत आहे, त्यामध्ये फक्त तारखांत बदल दिसून येतो. यावरून असे लक्षात येते कि प्रत्यक मानव समाजाने लहान मुलांना गृहीत न धरता त्यांचा विचार केला जावा,हि अपेक्षा . लहान मुलांना सुद्धा जगण्यासाठी अन्न,वस्त्र,निवारा यापेक्षा आणखी बऱ्याच बाबींची अपेक्षा असते.आजकाल ‘लहान मुल म्हणजे मातीचा गोळा’ हि संकल्पना आता इतिहासजमा झालेली असून, प्रत्येक बालकामध्ये काहीना काही विशेष गुण असतातंच हे सिद्ध झालेलं आहे. त्यांना सुप्त गुण म्हणतात. फक्त बालकांना तशी उपलब्धी करून देणे गरजेचे आहे, त्यातून ते स्वतः नवीन ज्ञान निर्माण करतात हे अधोरेखित करावंच लागेल. यातूनच ‘ज्ञानरचनावाद’ या शैक्षणिक संकल्पनेचा उदय झालेला आहे. यावरून प्रत्येक लहान बालक एक अनमोल निर्मिती आहे असंच म्हणावं लागेल.
                आजच्या धकाधकीच्या काळात सर्वच पालकांना आपल्या पाल्याकंडे बघायला वेळ मिळेलंच का ? हा सुद्धा एक प्रश्नच वाटतो.  एकीकडे धावपळीच्या दुनियेत 'मी मागे राहता कामा नये: यासाठी वाट्टेल ते करून इतरांच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षा समोर जायचंय.' अश्या विचारांनी ग्रासलेल्या आम्हा डिजिटल वीरांना  थोडीजरी उसंत मिळाली तरी हातात मोबाईल घेऊन या आभाषी दुनियेत वावरणाऱ्या आणि त्यामध्ये सतत गुंतून ठेवणाऱ्या आम्हा पालकांना हल्ली फारसा वेळच मिळत नाही. 'आजकाल डिजिटल मिडीयावर शुभेच्छा देणारे आम्ही प्रत्यक्ष मात्र आपापसात बोलायला सुद्धा टाळतो' हे एक कटू वास्तव आहे. "या इतक्या धावपळीत जगणाऱ्या  आई बाबांना,आपल्या पाल्यांसोबत बोलायला आणि त्यांना समजून घ्यायला आवडले तर, भाग्यंच म्हणावं लागेल त्या पाल्याचं!" त्याहीपेक्षा विशेष म्हणजे  टी.व्ही.,कॉम्पुटर आणि मोबाईलवर गुंतवून ठेवलेल्या अगदी प्ले ग्रुप तसेच नर्सरीच्या अन्  शिकवणीच्या ओझ्यानं दबलेल्या बालकाला सुद्धा आपल्या पालकांकडून काहीतरी शिकावं असं  वाटणं जरा इतिहासात जमा झाल्यागतच वाटतंय आता. त्यामुळे या काळात तरी सर्व पालकांना आपल्या पाल्यांप्रती जागरूक करणारा असा बालकदिन साजरा होणं फारच गरजेचं असल्याचं वाटतं.

                 "करेल मनोरंजन जो मुलांचे , जडेल प्रभुशी नाते तयांचे." असे म्हणणारे साने गुरुजी आणि त्यांच्या गोष्टीतील संस्कारी जीवन  किंवा ग्रामीण जीवनात अनुभवायला मिळालेले बालजीवन आता नजरेस पडणे जरा अवघडचं. 'एखाद्या लहान बालकाचं, घरात सकाळी उठून मोठ्या भावंडासोबत शुभसकाळ करून काकू किंवा आत्याच्या हाताने अंघोळ करून, नंतर आजोबांसोबत देवदर्शनाला गावातील मंदिरात जाऊन तेथेच समोर ईतर बालगोपाळांमध्ये खेळून येऊन, आपल्या आईच्या  (मम्मीच्या) हाताने जेवण करून, नंतर बाबासोबत (पप्पांसोबत) त्यांच्या कामात लुडबुड करून, दिवसभर काहीतरी नवीन शिकून, संध्याकाळी आजीबाईच्या गोष्टी ऐकून नकळत झोपी जाणं.' हे सगळं आता इतिहासजमा झाल्यागतच वाटतयं. या इतिहासगत झालेल्या गोष्टींनी बऱ्याच लोकांना आयुष्य जगण्यासाठी हव्या असलेल्या संस्काराचं बळ दिलंय हे सर्वश्रुत आहेच.  
               'लहान मुल म्हणजे या निर्मिकाने घरात पाठवलेलं त्याचंच एक रूप'. घरात बाळाचा जन्म म्हणजे आनंदच,पण या काळात मुलांना जन्माला घातल्यावर त्याची जोपासना कशी करावी याची जबाबदारी ज्यानं त्यानं आपापल्या सोयीनुरूप vवेगळी ठरवलेली असल्याचं हल्ली निदर्शनास पडतं.. लहान बालकाला जे जे हवं ते ते देणारे आईबाप आपल्या पाल्याला मात्र योग्य संस्काराचं खतपाणी देत असतीलंच कि नाही? हि खरी शंका आहे. "शुशिलो मातृपुण्येन ,पितृपुण्येन चतुरतः !!" असं मानणाऱ्या या संस्कृतीप्रीय  देशात आपण आपल्या लेकराला संस्कार देतोय का? हा विचार होणं गरजेचा आहे. ‘शुलीलता’ हि  आईकडून आणि ‘चतुरता’ हि वडिलाकडून असाच श्लोकाचा विचार. मग हे लेकराला देण्यासाठी आईवडिलांना विशेष काळजी घेणं अगत्याचं आहे. 'संस्कार' हि काही पाटीवर लिहून किंवा शिकवणी लाऊन पूर्ण करून घेण्याची प्रक्रिया नाही किंवा फक्त मोबाईलवर विविध कार्टून किंवा गोष्टी बघून मुलं शिकतील असंही नाही. त्यासाठी घरामध्ये मुलांना आपुलकीने सामाऊन घ्यावं लागतं. आपण आपल्या घरात आणि समाजात आपल्या लेकारांसमक्ष जसं वावरतो, आचरण करतो अगदी तसंच किंबहुना त्यापेक्षा अधिक पुढचं आचरण लेकरं करतात हा मुद्दामहून डोळ्यामागे टाकलेला सर्वांचा अनुभव वाटतो.  जी खेळणी शेजाऱ्याचा मुलाला असेल त्यापेक्षा जास्त सरस खेळणी माझ्या मुलाला कशी देता येईल ? याचा विचार करणारा बाप, आपल्या मुलाला चांगलं जगण्यासाठी आवश्यक असणारे संस्कार देईलच असं नाही.  "मला  हे पाहिजे.. ते पाहिजे.. " असं सगळं  फक्त घेण्याची सवय लागलेल्या मुलांना आपण देण्याची सवय कधी लावणार? यासाठी जुन्या कुटुंबव्यवस्थेत सहज होणारी संस्कारी देवान घेवाण आता कुठून विकत आणता येईल का ? यासाठी पालक मानून काय करावे लागेल? याचा विचारसुद्धा बालकदिनी होणे गरजेचे आहे.
                  आजकाल आपल्या मुलाला आपण कुठे पाठवतो? तो आपला वेळ कुठे घालतो? आपला मुलगा मोबाईल आणि संगणकावर काय पाहतो? कोणत्या मित्रांसोबत जातो? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊन पालकांनी आपल्या मुलांना योग्य दिशेने मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. 'मुले हि राष्ट्राची खरी संपत्ती आहे'. असे मानणाऱ्या नेहरूजींना या संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन करणे अति महत्वाचे वाटायचे. तसेच  युनो या जागतिक संघटनेला सुद्धा महत्वाचे वाटल्याने संपूर्ण विश्वात बालकदिन साजरा केला जातो. विविध व्यसनांच्या विळख्यात जाणाऱ्या लहान मुलांना रोखण्यासाठी पालकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. व्यसन करणे वाईट असते असे सांगतांना स्वतः पालकाने सुद्धा निर्व्यसनी असणे किंवा निदान पाल्यासमोर तरी व्यसन न करणे हे अपेक्षित असते. स्वतः तासनतास मोबाईल पाहत बसणाऱ्या पालकांना 'आपल्या पाल्याने मोबाईल पाहू नये' असे वाटणे म्हणजे केवळ मृगजळच  मानावे. 
               'आपल्या स्वतःच्या बालाकाविषयी जशी आपली जबाबदारी ठरते, तशीच आपल्या सभोवताली राहणाऱ्या इतर बालकांचा सुद्धा मानव या नात्याने विचार व्हावा' याकरिता सुद्धा बालकदिन अत्यंत महत्वाचा आहे. जन्माला येणारं प्रत्येक बाळ अत्यंत महत्वाचं आहे, याचाच परिपाक म्हणून, बाळ जन्माला येण्याच्या अगोदरपासुनच म्हणजे  आईच्या गर्भात असलेल्या गर्भाचे पोषण करण्यासाठी आजकाल अनेक यंत्रणा सज्ज असल्याचे निदर्शनास पडते. यामध्ये गावातील आशाताई, अंगणवाडी ताई , आरोग्य सेविका ते अगदी महिला बालआयोगा पर्यंत सर्वांचे प्रयत्न चालू असतांना आजही बालमृत्यू आणि बालकुपोषणाचे चित्र  सतत निदर्सानास येत आहे. 'एकीकडे काय काय खावे? असा प्रश्न तर, दुसरीकडे काय खावे? असा प्रश्न' आज समाजात उभा असल्याचे दिसत आहे. कचऱ्यातील शिळे अन्न वेचून खाणारी बालके हे आजच्या परिस्थितीचे विदारक चित्र समाजासमोर मांडतात. वाढती बालगुन्हेगारी आणि बालमजुरी हे सध्याचे बालविश्वातील प्रश्न आ वासून उभे असतांना; आता यासाठी अगदी सामान्य माणसांपासून ते सर्वोच्च प्रशासन आणि शानाने काय उपाय करता येईल याचे चिंतन करणे गरजेचे आहे. अगदी १९८६ पासून लागू करण्यात आलेला ‘बालमजुरी प्रतिबंध कायदा’ अजूनही बालमजुरी का थांबवू शकला नाही? हा सुद्धा चिंतन आणि चिंता करण्याचा प्रश्न आहे.
                ‘आजचं बालक हे उद्याचे आपले आणि आपल्या देशाचे भविष्य आहे’. म्हणून अश्या बालकांना उत्तम आहार,आरोग्य, शिक्षण आणि संस्कार देणे हे सुजाण पालक आणि सुज्ञ समाजाचे आद्य कर्तव्य आहे त्यादृष्टीने 'बालकाचा विचार' आणि 'बालविकास' व्हावा हीच अपेक्षा........

लेखन- श्री ज्ञानेश्वर गणपत झगरे
( शिक्षक तथा कीर्तनकार ) प्रा शा उमरखेडा.

शिव संवाद.- फेसबुक वरील लाईव्ह कार्यक्रम 'मन करा रे प्रसन्न'

https://m.facebook.com/story.php?story_fbid=177296593607156&id=100977544953592